न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२०) :- शहरात तीन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांत केवळ सोन्या चांदीचे दागिनेच नव्हे तर, टीव्ही देखील पळवल्याची घटना घडली आहे. या घटनांमध्ये पावणेचार लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
रमेश कुमार सिंग (वय ५५, रा. साई अपार्टमेंट पेंडसे कॉलनी, विकासनगर देहूरोड) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा २ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा ते दुपारी ४ या वेळेत घडली. या प्रकरणी देहूरोड ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संजय इंगोले (वय ४०, रा. कृष्णाई निवास, जाधववाडी, चिखली) यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरातील एलसीडी टीव्ही आणि मोबाईल हँडसेट असा १५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटा पसार झाला.
शहरात दुचाकी चोरीच्या आणखी तीन घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. यात बुलेट आणि दोन दुचाकी घराजवळून चोरट्याने नेल्या. जयेश अशोक सोरटे (वय २७, प्रेस्टीज पार्क, एकतानगर, चाकण) यांच्या बुलेटचे लॉक तोडून गाडी पळवली. दिलीप धर्मादास गायकवाड (वय ५६, इंदिरानगर, चिंचवड) यांची दुचाकी घराजवळून चोरीस गेली. शंकर तुकाराम साबळे ( वय ३९, लिलाई पार्क, ताथवडे, वाकड) यांची दुचाकीही घराजवळून पळवून नेली. चिखली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दिलीप विष्णू तुरुकमारे (रा. समता नगर हाऊसिंग सोसायटी, थेरगाव) यांच्या घरातून ७२ हजार १२५ रुपयांचे दागिने चोरट्याने पळविले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.















