- आमदार लक्ष्मण जगतापांच्या पाठपुराव्यास यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड येथे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने जिल्हा प्रशासनास आदेश दिला आहे. त्यामुळे मदतीसाठी पुण्यात २० किलोमीटरची पायपीट यांबणार आहे.
शहरास जिल्ह्याचा दर्जा नसल्याने सर्व प्रशासकीय कार्यालय पुण्यात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयातील कामासाठी पुण्यात जावं लागतं. संजय गांधी निराधार योजना अंध, दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरीक लाभार्थ्यांना योजनेच्या कागदपत्रांची पुर्तता करण्याकरिता व अनुदानाचा लाभ घेण्याकरिता पुणे येथेजावे लागत होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, असा विषय मांडला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
हवेलीच्या तहसीलदार विमल डोलारे यांना कार्यभार सांभाळून या विभागाची जबाबदारी दिली आहे. तसेच अप्पर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड मध्ये लिपीक भिमाशंकर बनसोडे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अर्जदारांचे योजनानिहाय अर्ज स्विकारणे, अजार्ची प्राथमिक छाननी करणे, आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी अर्जदारांना कळविणे, छाननी अंती पात्र असलेले अर्ज तहसिलदार हवेली संजय गांधी योजना शाखा यांना सादर करण्याची जबाबदारी असणार आहे.















