न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- कोविड सेंटरमध्ये काम करत असल्याच्या कारणावरून तसेच घरात पाणी नसल्याने पाणी पाहण्यासाठी इमारतीच्या छतावर जात असलेल्या महिलेला मारहाण केली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष कुंभार, गणेश कुंभार, छाया कुंभार, सोनम कुंभार, अश्विनी कुंभार, सुहास कुंभार (सर्व रा. अनंतनगर, पिंपळे गुरव) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी महिला कोविड सेंटरमध्ये काम करत आहेत. २ मे रोजी त्या कामावरून घरी आल्या. त्यावेळी त्यांच्या घरात पाणी नव्हते. त्यामुळे पाण्याची स्थिती पाहण्यासाठी त्या इमारतीच्या छतावर जाऊ लागल्या. त्यावेळी आरोपींनी फियार्दी यांना अडवले. तू वर कशाला चाललीस. तू कोरोना पेशंटच्या दवाखान्यात काम करतेस. तू वर येत जाऊ नकोस, असे म्हणून फियार्दी यांना छतावर जाऊ दिले नाही. हिला खाली ढकलून द्या, असे म्हणून अन्य आरोपींनी फियार्दी यांच्याशी गैरवर्तन केले.
फियार्दी घाबरुन त्यांच्या घरात गेल्या. त्यावेळी आरोपी त्यांना मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर धावून आले. फिर्यादी यांची मुले त्यांच्या मोबाईल टॅबमध्ये शुटींग काढत असल्याचे पाहून आरोपींनी बेकायदेशीरपणे घरात घुसून टॅब फोडला. फियार्दी यांना काठीने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. या प्रकाराबाबत फियार्दी यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यावर चौकशी करुन २६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















