न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२०) :- आदर्शनगर (किवळे) येथे अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रियसीचा खून केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यालयालयात हजर केले असता त्याला एक ऑक्टॉबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रिया चव्हाण (वय २०, रा आदर्शनगर, किवळे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रेश्मा शिलामन चव्हाण यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत गायकवाड याला अटक केली आली आहे. तर त्याचा साथीदार विक्रम रोकडे (रा. रहाटणी) आणि दुसरा अल्पवयीन साथीदार याला ताब्यात घेतले आहे.
प्रिया चव्हाण हिचे मागील पाच वर्षांपासून प्रशांत गायकवाड याच्यासोबत अनैतिक संबंध होते आणि यातून प्रियाला एक मुलगी झाली आहे. प्रिया ही माहेरी आदर्शनगरला राहत होती. शुक्रवारी रात्री बारा वाजता प्रशांत गायकवाड याने तिच्याशी भांडण केले. तसेच, जबरदस्तीने तिला घेऊन गेला. रात्री उशिरापर्यंत प्रिया घरी न आल्यामुळे गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी गायकवाड हा पळून जाण्याचा तयारीत असताना त्याला अटक केली. तपासादरम्यान आरोपी गायकवाड याने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की, तो विवाहित असून त्याची पत्नी किवळे येथे राहते. प्रिया आणि प्रशांत यांच्यात खर्चावरुन, बाळाचे संगोपनावरुन वाद होत होते. प्रिया वारंवार प्रशांतचे किवळेतील त्याच्या घरी जाऊन वाद घालत होती. त्यामुळे मानसिक त्रासाला कंटाळून व रात्री झालेल्या भांडणात रागाने तिला आदर्शनगरमधील खदान भागात घेवून जावून प्रथम गळा दाबून व नंतर दगडाने वार करून खून केला. तसेच, पुरावा नष्ट करण्यासाठी साथीदाराच्या मदतीने खदानच्या पाण्यात शव टाकून दिले.















