न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२०) :- कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असल्याने या झोपडपट्ट्यांमध्ये पोर्टेबल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा पुरविणाऱ्या ठेकेदार कंपनीसोबत प्रति पोर्टेबल टॉयलेटपोटी रुपये करारनामा केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांतील नागरिकांच्या आरोग्यासाठी ही योजना राबविण्यात आली. राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना रुग्ण आढळणाऱ्या भागात कन्टेन्मेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ७५ हजाराच्या पुढे गेला आहे. शहरात मे महिन्यात झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. त्यासाठी झोपडपट्टीत आरोग्याच्या दृष्टीने तातडीने पोर्टेबल टॉयलेट उपलब्ध करुन देण्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ७ मे रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर तातडीने काही झोपडपट्टी भागांत पोर्टेबल टॉयलेट बसविले होते.
पालखी सोहळ्याच्या कालावधीत सिक्यूअर जायटी फैसिलिटी मॅनेजमेंट यांना पोर्टेबल टॉयलेट हे प्रति १८८८ रुपये या दराने पुरविण्याबाबत विचारणा केली. आयुक्तांनी दर कमी करण्यासाठी विनंती केली, त्यानंतर संबंधित संस्थेने १२७५ रुपये या सुधारित दराने टॉयलेट पुरविण्यास तयार असल्याचे कळविले. त्यानंतर संबंधितांना काम देण्यात आले आहे.















