न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यावरुन आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे. उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज आहेत परंतु राज्य राजासारखं चालवत असून हे लोकशाहीला घातक आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला आहे.
या घटनेवर नवाब मलिक म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये योगीजी ज्या पध्दतीने सरकार चालवत आहेत यावरून ते त्यांच्या सहकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना खुली सूट देत आहेत. हाथरसमध्ये दलित बालिकेवर सामुहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या झाली. सुरुवातीला फेक न्यूज आहे असं काही घडलंच नाही म्हणणार्या योगी सरकारने त्या बालिकेवर रातोरात अंत्यसंस्कार का केले? यातून स्पष्ट होते की उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य राहिलेले नाही असा आरोप त्यांनी केला.
तसेच उन्नावमध्ये भाजपा आमदार सेंगरला वाचवण्याचा प्रयत्न झाला तसा या केसमध्ये आणि यासारख्या अनेक केसेस उत्तरप्रदेशमध्ये आहेत. ज्यांना सरकार अशी वागणूक देत आहे, हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना दु:ख झालं असेल तर योगींचा तात्काळ राजीनामा घेवून सरकार बरखास्त करावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले.















