- शहरातील रेल्वेसेवा सुरु, रेस्टॉरंट-बार यांना ५० टक्के क्षमतेसह परवानगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- अनलॉक पाचमध्येही कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत. खासगी व शासकीय आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीसह, नियमावलीचे पालन करून रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिली आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
जिम आणि व्यायामशाळा, धार्मिक स्थळे, तलाव बंदच राहणार आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने अनलॉक पाचची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पिंपरी – चिंचवड महापालिकेने नियमावली तयार केली आहे. आयुक्त हर्डीकर यांनी शुक्रवारी नियमावली जाहीर केली आहे.
शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. ऑनलाइन शिक्षणास परवानगी.
चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, सर्व प्रकारचे सभागृह, नाट्यगृह, मनोरंजनपर सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम सभा, संमेलनांना बंदी. धार्मिक स्थळे, सभा संमेलने बंद राहणार आहेत. शहर परिसरातील ६५ वर्षावरील व्यक्ती, अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्षे दहापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना, अत्यावश्यक काम, वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
कंटेन्मेंट झोनमध्ये वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा वस्तू पुरवठ्याची साखळी कायम ठेवता येणार. महापालिका कर्मचाऱ्यांनी स्मार्ट सारथी अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य. शॉपिंग मॉल, मार्केट यांना यापूर्वी दिलेल्या परवानगी आणि नियम लागू असणार आहेत. चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि बार यांना ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येईल. शहर परिसरातील रेल्वेसेवा सुरळीत होणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व खासगी अस्थापना ५० टक्के मनुष्यबळासह सुरु ठेवता येतील.


















