- तूट भरून काढण्याचा आयुक्तांकडून प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- कोरोना व लाॅकडाऊनमुळे आर्थिक फटका बसला आहे. २१ कोटी ५५ लाख रुपयांचे उत्पन्न कमी मिळाले आहे. महापालिकेने येत्या सहा महिन्यांसाठी विशेष योजना आखली आहे. त्या माध्यमातून तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लॉकडाउनचा आर्थिक फटका महापालिकेला बसला आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत मालमत्ताकरातून पालिकेला केवळ २२० कोटी रुपये मिळाले आहेत. एक लाख ६३ हजार २७९ मिळकतकरधारकांनी कराचा भरणा केला आहे. मागीलवर्षी पहिल्या सहामाहीत ३४१ कोटी ५६ लाख रुपये जमा झाले होते. त्या तुलनेत यंदा उत्पन्न कमी मिळाले आहे. सहा महिन्यांत उत्पनाची तूट भरून काढण्यासाठी विशेष योजना आखल्याचे हर्डीकर यांनी स्पष्ट केले.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, शहरात ५ लाख २७ हजार ३३८ मालमत्ता आहेत. त्यामध्ये निवासी चार लाख ४७ हजार, बिगरनिवासी ४६ हजार ८२८, औद्योगिक ३ हजार ७००, मोकळ्या जागा ८ हजार ७८१, मिश्र १५ हजार ८१९ आणि इतर पाच हजार २०२ यांचा समावेश आहे. त्यातून पालिकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. परंतु, लॉकडाऊनमुळे नागरिकांकडून कर भरण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व विभागीय करसंकलन कार्यालये अनेक दिवस बंदच होती. त्यामुळे ज्यांना कराचा भरणा करायचा आहे. त्यांना कर भरणा करता आला नाही. ऑनलाइनच्या माध्यमातून प्रयत्न झाले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कराचे सर्वाधिक ५४ कोटी ७९ लाख रुपयांचे उत्पन्न थेरगाव विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाले. तर, पिंपरीनगर कार्यालयात सर्वात कमी म्हणजेच सुमारे दीड कोटी रुपयांचा भरणा झाला आहे.


















