- पालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- विविध नागरी प्रश्नांसाठी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक हे पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे निवेदने, तक्रारी करीत असतात, त्यावर कारवाई करून लोकप्रतिनीधींना माहिती देणे आवश्यक असते. मात्र , निवेदने, तक्रारींवर महापालिका विविध विभागाकडून कारवाई होत नसल्याचे आढळून आल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दखल घेतली आहे. तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. केलेल्या कारवाईचा अहवाल त्यांना अवगत करावा. विलंब केल्यास विभागप्रमुखांवर कारवाईचा इशारा आयुक्त हर्डीकर यांनी दिला आहे.
पिंपरी -चिंचवड शहरातील विकास कामे, विविध बाबींबाबत मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या पिंपरी – चिंचवड पालिकेकडे निवेदने, तक्रारी येत असतात. त्यावर कारवाई करणे अभिप्रेत आहे. त्यावर केलेल्या कारवाईची माहिती पालिकेच्या वेबसाईटवरील फाईल नोंद, आवक रजिस्टरमध्ये अद्यावत करण्यात यावी. परंतु, निवेदने, तक्रारीवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब गंभीर असून कार्यालयीन सुसूत्रेस धरून नाही. यामुळे जनमानसातील पालिकेच्या विश्वासास तडा जात आहे, असे आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
लोकप्रतिनिधी त्यांच्या भागांतील समस्या मांडत असतात. मात्र, त्या अनेक दिवस प्रलंबित राहतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या कामांना प्राधान्य देऊन जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. तसे न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विभागप्रमुख, शाखाप्रमुखांची राहील. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.