- शंभरचा मुद्रांक मिळतोय ५०० रुपयांना; शहर नोटरी संघटनेची ओरड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात शंभरचा मुद्रांक ५०० रुपयांना मिळत आहे. नागरिकही काम वेळेत होण्यासाठी गप्प राहतात. जादा पैसे न देणाऱ्यास मुद्रांक देण्यास टाळाटाळ केली जाते, अशी तक्रार अँड. पी. डी. नांगरे यांनी सहजिल्हा निबंधकांकडे केली आहे.
शहरात सुमारे ३० मुद्रांक विक्रेते आहेत. मात्र, सोयीसाठी त्यांचे विक्रेता व लिहून देणारा असे वर्गीकरण केले आहे. वास्तवात विक्रेता लिहून देत असून लिहिणारा मुद्रांक विक्री करत आहे. जमीन खरेदी – विक्री, तारणपत्र, बँक कर्ज, दत्तकपत्र, मृत्युपत्र, बंधननामा, हक्कसोडपत्र, प्रतिज्ञापत्र आदी कामांसाठी मुद्रांकाचा वापर करावा लागतो. प्रत्येक मुद्रांकामागे विक्रेत्यांना तीन ते १५ रुपये कमिशन मिळते. तरीही सर्रासपणे जादा दराने विक्री केली जात आहे.
मोरवाडी न्यायालय कक्षात मूळ रकमेला मुद्रांक विक्री केले जातात. पण, वेळ कमी असल्याने दुपारी दोननंतर मुद्रांक मिळणे मुश्लिक होते. याकडे सहजिल्हा निबंधकांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा पिंपरी – चिंचवड नोटरी असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. दीपक ओव्हाळ यांनी व्यक्त केली.
नव्या नियमानुसार सुटीच्या दिवशी व कार्यालयीन कामकाज बंद झाल्यानंतर मुद्रांकाची विक्री करणे बेकायदा आहे. मात्र, मुद्रांक विक्रेत्यांकडून रात्री व – सुटीच्या दिवशीसुद्धा पुढील कामाच्या दिवसाची तारीख टाकून जादा दराने मुद्रांक विक्री सुरू आहे.
– अॅड.पी.डी. नांगरे, अध्यक्ष, पिंपरी – चिंचवड नोटरी असोसिएशन.