मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना ‘वेटिंगच’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- पुणे ते लोणावळा दरम्यान दोन सत्रांत लोकल सेवा सुरू होत आहे. १२ ऑक्टोबरपासून ही लोकल धावणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकलमधून प्रवास करू शकतील; मात्र त्यांना पोलिस प्रशासनाकडून पास घेणे अनिवार्य असणार आहे.
केवळ पासधारक कर्मचारीच प्रवास करू शकणार आहेत. सामान्य प्रवाशांना मात्र प्रवासास परवानगी दिलेली नाही. पोलिस प्रशासन, रेल्वे अधिकारी यांच्यात लोकल सेवा सुरू करण्याबाबत बैठक झाली. यात १२ ऑक्टोबरपासून लोकल सेवा सुरू करण्याबाबत मुंबईच्या धर्तीवर पुण्यात लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला.
त्यासाठी पास अनिवार्य आहे. क्यूआर कोड प्रणलीचा वापर करून पास दिले जाणार आहेत. लिंकवर जाऊन अर्ज करायचा आहे. या वेळी कार्यालयीन ओळखपत्र, फोटो, फिटनेस प्रमाणपत्र व अन्य माहिती सादर करावी लागेल. पोलिस अर्जाची पडताळणी करून संबंधितास क्यूआर कोड देतील. त्यावरून लोकल मध्ये प्रवास करण्यास मुभा मिळेल. ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे, अशी माहिती पुण्याचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.


















