- परवानाही होऊ शकतो रद्द; विभागीय आयुक्तांकडून हॉटेल चालकांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. या नियमांचे हॉटेल चालकांकडून पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी पथके स्थापन केली जाणार आहेत.
ही पथके हॉटेलची तपासणी करणार असून यामध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ५० हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच, दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास हॉटेल परवाना काही दिवसांसाठी निलंबित आणि जर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉटेल व्यवसायाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. करोना परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विभागीय आयुक्त राव यांनी ही माहिती दिली.


















