न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- उद्योगनगरीत रात्रगस्तीसाठी नागरिकांनी पुढे यावे, म्हणून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून प्रयल सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांना मोठ्या बंदुकीचा परवाना देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयात शस्त्र तसेच शासनाच्या संकेतस्थळावर परवान्यासाठी अर्ज उपलब्ध आहेत. परवान्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करून विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागणार आहे.
यात फॉर्म ए १ (अर्जदाराची माहिती, परवाना पाहिजे असलेला तपशील) फॉर्म एस २ (शस्त्र , दारुगोळा ठेवण्याच्या जागेचा तपशील) फॉर्म एस ३ (वैद्य प्रमाणपत्राचा नमुना) प्रतिज्ञापत्र ( वैयक्तिक माहिती, नोकरी, व्यवसाय यांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचा तपशील).
अर्जदाराने शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. तसेच अर्जदार अविवाहित असल्यास आईवडील यांचे किंवा अर्जदार विवाहित असल्यास पत्नीचे संमतीपत्र अर्जासोबत आवश्यक आहे. हयात व मयत शस्त्र परवानाधारकांचा परवाना वारसाहक्काने देखील हस्तांतरित करता येतो. त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
विहित नमुन्यातील अर्ज पोलीस आयुक्तालयातील नोंदणी शाखेकडे जमा केल्यानंतर तेथून अर्ज शस्त्र परवाना शाखेकडे पाठविला जातो. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडून अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, रहिवासीचे ठिकाण आदी तपासणी होते. त्यानंतर अर्ज सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर केला जातो. त्यांच्याकडून पडताळणी झाल्यानंतर पोलीस उपायुक्त यांच्याकडे आणि त्यानंतर पुन्हा नोंदणी शाखा, परवाना शाखा यांच्याकडून पोलीस आयुक्त यांच्याकडे अर्ज सादर केला जातो. शस्त्र परवाना मंजूर केला जातो.















