- आयुक्तांकडून पालिकेचा सन २०२०-२१ अर्थसंकल्पाच्या कामाला सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन २०२०-२१ चा मूळ अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. पुढील वर्षापासून महसुली आणि भांडवली अर्थसंकल्प ई – बजेट प्रणालीमधूनच सादर केला जाणार आहे. सर्व विभागांनी अर्थसंकल्पाची आकडेवारी १ नोव्हेंबरपूर्वी लेखा विभागाकडे सादर करावी, असे निर्देश आयुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेत आर्थिक वर्षापासून महसुली आणि भांडवली अर्थसंकल्प हा लेखा विभागाने तयार केलेल्या ई – बजेट प्रणालीमधूनच सादर केला जाणार आहे. सर्व विभागांना सद्य:स्थितीत लेखा विभागामार्फत देयके ट्रॅक करण्याकरिता युझर आयडी दिले आहेत. ‘ फायनान्सियल अकाउंटिग ‘ या संगणक प्रणालीमध्ये ई – बजेट मेनू उपलब्ध केला आहे.
प्रणालीसाठी विभागांना केलेल्या सूचना मूळ अर्थसंकल्पातील क्रम चुकवू नये, अर्थसंकल्पातील लेखाशीर्षाचा क्रम मूळ अर्थसंकल्पातील क्रमानुसार घेण्यात यावा. सुधारित अर्थसंकल्पात मूळ अर्थसंकल्पापेक्षा जास्त रकमा मान्य होईल, हे अपेक्षित धरून कोणतीही कामे सुरु करु नये. शहरातील गरिबांसाठी सेवा सुविधा देण्याकरिता अर्थसंकल्प स्वतंत्र तयार केला असल्याने अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र माहिती सादर करावी. क्षेत्रीय कार्यालयांनी स्वतंत्र महसुली जमाखर्च दाखवावा. विद्युत, पाणीपुरवठा, स्थापत्य, अर्थसंकल्प आणि इतर सर्व विभागांतील मुख्यालय व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत कामांच्या वेगवेगळ्या याद्या सादर कराव्यात. क्षेत्रीय कार्यालयांनी प्रस्तावित केलेल्या कामांच्या याद्या विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीने पाठवाव्यात. क्षेत्रीय कार्यालयांच्या १० लाख रुपये वित्तीय मर्यादेचे उल्लंघन होणार नाही. कामे दुबार होणार नाहीत, याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी. जी कामे प्राधान्याची आहेत, अशाच नवीन कामांचा समावेश सुधारित व मूळ अर्थसंकल्पात प्रस्तावित करावा. त्यांच्या बिलांच्या पूर्ततेसाठी आवश्यक पूर्ण तरतूद करावी. पुरेशी तरतूद न केल्यास संबंधित विभाग प्रमुखांना व्यक्तीश: जबाबदार धरून शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल.















