न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांची निवड मंगळवारच्या सर्वसाधरण सभेत केली जाणार होती. मात्र सदस्यांच्या नावाबाबत सत्ताधारी भाजपमध्ये एकमत न झाल्याने सदस्य आणि सभापतिपदाची निवड लांबणीवर पडली आहे.
महापालिकेतील विषय समित्यांची मुदत १४ जून रोजी संपली. प्रत्येक विषय समितीवर नऊ सदस्य आहेत. सभागृहातील संख्याबळानुसार नऊ सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य यांना समितीवर संधी मिळणार होती.
संबंधित पक्षांच्या सदस्यांची नावे संबंधित पक्षाचे गटनेते सर्वसाधारण सभेत महापौरांकडे सादर करतात. त्यानंतर सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाते. यात सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांना संधी मिळणार होती. मात्र सभेत एकमत न झाल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.


















