- स्टार हॉस्पिटलचा प्रताप; डॉक्टरांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२०) :- रुग्णाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशीचे व्हेंटिलेटर बिल लावणाऱ्या स्टार हॉस्पिटलचे डॉक्टर आणि बिलाचे पैसे घेणाऱ्या विरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्टार हॉस्पिटलचे डॉ. अमित वाघ आणि पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुस्तफा अब्दुल गफार तंबोळी (वय १९, रा. भांगरे कॉलनी, पाटीलनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांची आई मुमताज अब्दुल गफार तंबोळी (वय ३७, रा. भांगरे कॉलनी) कोरोनाबाधित होत्या. त्यांच्यावर स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांचे २४ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी निधन झाले. मात्र, त्यांच्यावर २५ ऑगस्ट रोजी व्हेंटिलेटरवर उपचार केल्याचे ९ हजार रुपयांचे बिल लावण्यात आल्याची फिर्याद पोलिसांत दाखल झाली आहे.
हॉस्पिटलची कागदपत्रे तपासल्या नंतर मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीचे व्हेंटिलेटरचे बिल दिले गेले आहे. बिलाची कागदपत्रे तपासल्यानंतर स्टार हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निगडी पोलिसांनी दिली.















