न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑक्टोबर २०२०) :- भोसरी येथील विद्युत रोहित्राच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या तीन मृतांच्या कुटुंबीयांना महावितरणकडून शुक्रवारी (दि. ९) प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये राजवाडा बिल्डींग दोनजवळ विद्युत रोहित्राचा चार सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाला होता. या घटनेत शारदा दिलीप कोतवाल, हर्षदा सचिन काकडे व त्यांची मुलीचा मृत्यू झाला होता. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना महावितरणकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.
कोरोनामुळे मदतनिधी मंजूर करण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. अखेरीस शुक्रवारी भोसरी विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी मदतीच्या रकमेचे धनादेश कुटुंबीयांना सुपूर्द केले.