न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑक्टोबर २०२०) :- अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के आणि स्वाक्षरी करून शिधापत्रिका वितरीत करणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. न्यायालयाने त्यांना येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अल्ताफ महंमद शेख (वय २९, रा. जय मल्हार हाऊसिंग सोसायटी, टॉवरलाइन तळवडे), राजेंद्र दादा कसये (वय ५५, रा. स्वराज कॉम्प्लेक्स, काळेवाडी) यांना बनावट शिधापत्रिका प्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिधापत्रिका काढून काढून देतो म्हणून आरोपी लोकांकडून पैसे स्वीकारत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संत तुकाराम व्यापारी संकुलाच्या वाहनतळातून आरोपींना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून चौदा कोऱ्या आणि एक लिहिलेली शिधापत्रिका जप्त करण्यात आली आहे. अन्न धान्य विभागाच्या परिमंडळ अ आणि फ विभागाच्या अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के आढळून आल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक डी. एस. कोकाटे यांनी दिली.
आरोपींकडे कोऱ्या शिधापत्रिका नक्की कोठून आल्या, किती जणांना बनावट शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले, त्यापोटी किती रक्कम स्वीकारली, यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.