- पालिकेच्या महत्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवून बनविले ‘कारभारी’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांनी अतिरिक्त आयुक्त एक आणि दोन यांच्या विभागाच्या कामकाजात अदलाबदल केली आहे. करोनाकाळात धडाकेबाज कामगिरीने चर्चेत असलेल्या अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्यावर वादग्रस्त आणि गुंतागुंतीच्या विभागाची जबाबदारी सोपवीत त्यांच्यावर आयुक्तांनी विश्वास दाखविल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेत प्रतिनियुक्तीवर दोन आणि महापालिकेचा एक अशी एकूण तीन अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रतिनियुक्तीवर संतोष पाटील (एक) आणि अजित पवार हे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर प्रवीण तुपे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (तीन) चा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ( एक ) यांच्या कार्यशैलीमुळे नगरसेवकही नाराज होते. महासभेत ज्येष्ठ नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त ( एक ) यांच्यावर ताशेरे ओढले होते. गावची पाटीलकी सोडून कामकाजात बदल करा, असा सल्लाही दिला होता. फाइल्सवर दहा – पंधरा दिवस सही होत नसल्याने आयुक्तांकडे तक्रारी वाढल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त ( दोन ) यांनी मात्र करोनाकाळात कार्यक्षमतेची चुणूक दाखविली होती. पवार यांच्याकडील विभागाचा कारभार गतिमान झाल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. करोना सारख्या महामारीत जबाबदारीने निर्णय घेतल्याने त्यांच्यावर वादग्रस्त ठरलेला पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, तसेच महसूल वाढवण्याच्या दृष्टीने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, तर नद्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पर्यावरण अभियांत्रिकी असे महत्त्वाचे विभाग नव्याने त्यांच्याकडे सोपवले आहेत.
पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, बांधकाम परवानगी, अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभाग), पर्यावरण अभियांत्रिकी, मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय, कर आकारणी व करसंकलन विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर, भूमी आणि जिंदगी, सर्व क्षेत्रीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहासह), निवडणूक जनगणना (आधारसह), सभाशाखा असे महत्त्वाचे १४ विभाग पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.












