- भाजपच्या दोन्ही आमदारांसह महापौर व स्थायी सभापतींच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तसेच, पालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे ठप्प व अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यासाठी कामाला लागा, अशा सक्त सूचना महापौर उषा ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोढे तसेच, भाजपच्या आमदारांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने त्यासाठी कोरोना नियंत्रणाप्रमाणेच आता, विकासकामांवरही लक्ष द्यावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने मंजुरी देऊनही त्यांना गती मिळालेली नाही. त्यामुळे शहरवासीयांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून त्यांना गती द्या. नवीन कामे सूचवा. अपूर्ण कामे पूर्ण करा, अशा अनेक सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आ. लक्ष्मण जगताप यांनी महत्वाचे प्रकल्प व आवश्यक योजनांना मंजुरी देऊन ती तातडीने पूर्ण करण्यावर भर द्या, अशा सूचना आयुक्तांना केल्या. आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे. पावसामुळे रस्ते, नाले, सांडपाणी वाहिन्याचे चेंबरची दुरवस्था झाली आहे. तसेच, मैदान, शाळांची दुरुस्ती अशी कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे.












