- जन अधिकार संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मजीद शेख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसें ) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे वायसीएम रुग्णालय हे आजवर अनेक कारणांनी चर्चेत आलेले आहे. रुग्णांची हेळसांड असो की आरोग्य सुविधांची कमतरता असो. महापालिकेच्या या रुग्णालयाचे शुक्लकाष्ट काही केल्या संपत नाही. या रुग्णालयाच्या अंदा-धुंद कारभारामुळे रुग्णांच्या जीवाची हेळसांड होत आहे. रुग्णांच्या आरोग्य समस्यांची दाखल घेत जन अधिकार संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मजीद शेख यांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना समस्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनावर पिंपरी चिंचवड सलमानी जमातीचे नसिम शेख, लोक जनशक्ती पक्षाचे प्रवीण कांबळे, स्वराज प्रतिष्ठानचे कांबळे, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी व आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
मजीद शेख यांनी वायसीएम रुग्णालयातील आरोग्य गैरसोयींकडे लक्ष वेधले असून, यात रुग्णालयात पहाटे ५ च्या दरम्यान अतिताडीच्या रुग्णाला प्रथमोपचार देण्यासाठी एकही डॉक्टर उपलब्ध नसतो. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर कार्यालयीन वेळेत रुग्णालयात उपस्थित न राहता, शासनाची फसवणूक करीत आहेत. या वेळेत डॉक्टर बाहेर आपली क्लिनिक व हॉस्पिटल्स चालवितात व डॉक्टरी पेशाशी अप्रामाणिक राहतात. तातडीच्या प्रसंगी अनुपस्थित राहून रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्ण शस्रक्रियासाठी दाखल झाल्यानंतर त्याच्यावर शस्रक्रिया न करता, त्याला अनावश्यक तपासण्या करण्यास सांगितले जाते. रुग्ण वैतागून शेवटी खाजगी दवाखान्यात भर्ती करण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा काम करीत आहे. खाजगी रुग्णालयाचा खर्च न परवडणारे रुग्ण महापालिकेच्या या रुग्णालयात दाखल होतात. त्यांनी कोणाच्या तोंडाकडे पहायचे, की आपला जीव द्यायचा?
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे हे कर्तव्यात कसूर करीत आहेत. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर व डॉ. साळवे हे रिंग पद्धतीने व संगनमताने रुग्णालयाचे अंतर्गत कामांचा ठेका आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देतात. त्यामुळे प्रामाणिक ठेकेदारांना याचा त्रास होत आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध असतानाही बाहेरील केमिस्टकडून औषधे आणण्याची सक्ती केली जाते. यात बाहेरील केमिस्ट व ठेकेदार यांच्यात आर्थिक लागेबांध आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता कक्ष सर्वसामान्य नागरिकांकरीता उपलब्धच नसतो, त्याकरीताही रुग्णालयात वशिला लावावा लागतो.
या सर्वांना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व वायसीएम रुग्णालयाचे अधिकारी डॉ. पवन साळवे हेच जबाबदार आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयात चौकशी समिती नेमून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. १५ दिवसात जर या प्रकरणाचा छडा लागला नाही, तर जन अधिकार संघटनेच्यावतीने संविधान व कायद्यास धरून, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.












