न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२०) :- काळेवाडीतील सेवा विकास सहकारी बँकेत आरोपी क्लार्क म्हणून काम करतो. लॉकडाऊनच्या काळात बँकेत कर्मचारी संख्या कमी होती. त्याचा आरोपीने गैरफायदा घेतला. बँकेतील न वापरातील बँक खात्याचे बनावट व्हाऊचर्स आणि चेक तयार केले. बँकेतील अकाउंटंट यांच्या बँकेच्या लॉगीन चालू असलेल्या संगणकावरून बँकेतील न वापरातील डॉरमेट अकाउंट अक्टिव्ह केले.
प्रशांत शर्मा या व्यक्तीच्या परस्पर त्यांची कागदपत्रे वापरून त्यांचे नवीन बनावट चालू खाते बनवले. त्याद्वारे बनावट व्हाऊचर्स आणि चेकद्वारे व्यवहार केले. तसेच बँकेतील खातेधारक विश्वकर्मा पन्नालाल यांच्या खात्यातून ३२ लाख, नामला सत्यवती यांच्या खात्यातून २४ लाख ५० हजार, अर्चना विश्वकर्मा यांच्या खात्यातून १६ लाख ३३ हजार, कल्पना नायडू यांच्या खात्यातून २४ लाख रुपये, शकुंतला नखाते यांच्या खात्यातून एक कोटी ३६ लाख रुपये असे एकूण २ कोटी ३२ लाख ८३ हजार रुपये रोख आणि चेकद्वारे आरोपीने आई आणि वडील यांच्या संगनमताने त्या रकमेचा अपहर केला.
हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आल्यानंतर आरोपीने अपहार केलल्या रकमेपैकी ३८ लाख रुपये बँकेला परत केले. मात्र उरलेले एक कोटी ९४ लाख ८३ हजार रुपये परत न करता बँकेची फसवणूक केली. हा प्रकार २ मे ते ७ सप्टेंबर २०२० या कालावधीत सेवा विकास सहकारी बँक काळेवाडी शाखा, पिंपरी येथे घडला. कालिदास बाजीराव सुतार (वय ५४, रा. काळेवाडी) यांनी याबाबत बुधवारी (दि. ४) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कर्मचारी धीरज मकरदेव पगारो याच्यासह त्याची आई दीपा मकरदेव पगारो, वडील मकरदेव मिरचूमल पगारो (सर्व रा. वैभवनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचारी धीरज याला पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


















