न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- अल्पवयीन मुलांनी मौजमजेसाठी तब्बल पंधरा सायकल चोरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गस्त सुरू असताना पोलीस कर्मचारी विनोद होनमाने यांना प्राधिकरण येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर दोन मुले गिअरची सायकल घेऊन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.
त्यावेळी दोन मुले काळ्या रंगाची गिअरची रेंजर सायकल घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ही सायकल आमचीच असल्याचा दावा केला. त्या मुलांना निगडी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर निगडी प्राधिकरण येथील एका बंगल्यातून सायकल चोरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, तिघांनी मिळून आणखी चौदा सायकली चोरल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.