- पालिका आयुक्त उपमहापौरांकडून दंड वसूल करणार का? नागरिकांचा सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरदी विराजमान होताच नवनिर्वाचित उपमहापौर केशव घोळवे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी थेट मुंबई गाठली. उपमहापौर पद मिळवून देण्यात मुंडेचा मोठा वाटा असल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. मात्र, भेटीदरम्यान त्यांनी मास्क न वापरता सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांना सविस्तरपणे बगल दिल्याची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच त्यांच्याबरोबर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे हे देखील उपस्थित होते.
करोनाचा प्रादुर्भाव असताना सोशल डिस्टंसिगं पाळणं, मास्क वापरणं अत्यंत अनिवार्य आहे. मात्र काही जणांकडून या नियमांचे उल्लंघन होताना दिसते. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका तर्फे दंडात्मक कारवाई केली जाते. मास्क वापरत नसलेल्या नागरिकांकडून दंड आकारण्यात येत आहे. पालिका प्रशासनाचे अधिकारी रस्त्यावर उतरून विना मास्क फिरणाऱ्यावर ही कारवाई करत आहेत.
मात्र, येथे सत्ताधारी भाजपच्या उपमहापौरांकडूनच नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. पालिका आयुक्त उपमहापौरांकडून विनामास्क प्रकरणी दंड वसूल करणार का? नियम केवळ सर्वसामान्य नागरीकांनाच आहेत काय?असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.


















