- कोरोनाच्या काळात शहरवासियांनी दिवाळीचा आनंद संयमाने लुटावा – इरफानभाई सय्यद…
- साद सोशल फांडेशनने कोरोना काळातही जपली माणुसकी..
- अंध बांधवाना दिवाळी फराळ वाटपाच्या निमित्ताने दिला एक हात मदतीचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२०) :- डोळ्याला दिसत नसणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. आज कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी दिवाळीचा आनंद संयमाने लुटावा. उद्धवसाहेबांनी नागरिकांसाठी राबविलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून, नागरिकांनी कोरोनापासून दूर रहावे व कमी प्रमाणात फटाके वाजवून प्रदूषण रोखावे. शहरवासियांनी कोरोनाचा अंधकाररुपी राक्षस संपविण्यासाठी जास्तीत जास्त दीप प्रज्वलन करून, शहर प्रकाशप्रमाणे तेजोमय करावे, असे प्रतिपादन कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी केले.
साद सोशल फांडेशनच्या वतीने आज गुरुवारी (दि. १२) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील अंध बांधवांच्या कुटुंबीयांसाठी आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात “दिवाळी फराळ वाटप” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी इरफान सय्यद बोलत होते. यावेळी जवळपास शंभर अंध बांधव व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. अंध बांधवांच्या दिवाळीत प्रकाशवाटा पेरण्यासाठी आणि त्यांच्या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता.
निलेश मुटके म्हणाले, साद सोशल फांडेशनच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून अंध बांधवांसाठी दिवाळी फराळ वाटपाचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी अंध बांधवांप्रती आपले मदतकार्य सुरु ठेवले आहे. समाजातील अंध बांधव व त्यांचे कुटुंबियांना आधार देण्याचा छोटासा प्रयत्न होताना दिसतो. या माध्यमातून दिव्यांग बांधवामध्ये समाजात वावरण्याचा आत्मविश्वास निर्माण होत आहे. साद सोशल फांडेशनने नेहमीच आपला ‘एक हात मदतीचा’ समाजापुढे केला आहे. पंढरीची वारी असो की कोरोना काळातील मौल्यवान मदत असो, त्यांची माणुसकी कोठेही कमी होताना दिसत नाही. संस्थेने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
अनिल कातळे म्हणाले की, छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी स्वराज्याचे तोरण हाती घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. रयत सुखी केली. त्याचा वसा घेऊन इरफानभाईंनी कार्यकर्ते घडविले. संघटना वाढविली. वादळात दिवा जसा तेवत राहतो तसाच समाजकार्याचा वसा त्यांनी हाती घेतला. अंध बांधवाना मदतीसारखे उपक्रम राबवण्याचे काम इरफानभाई व त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यांच्या कार्याची व्याप्ती अशीच वाढत रहावी.
यावेळी शिवसेना खेड-भोसरी विधानसभा सहसंपर्क प्रमुख इरफानभाई सय्यद, सूर्या इलेक्ट्रोनिक्सचे रमेश चौधरी, एमपीसी न्यूजचे अनिल कातळे, भाजपचे शहर उपाध्यक्ष किसन बावकर, शिवसेनेचे निलेश मुटके, साद सोशल फौंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. महेश शेटे, जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव, कार्याध्यक्ष परेश मोरे, संघटक राहुल कोल्हटकर, उद्योजक भीमसेन अगरवाल, दस्तगीर मुनियार, भालेराव, विश्वास टेमगिरे, डॉ. प्रताप सोमवंशी, अनिल दळवी, गर्जे, प्रभाकर गुरव, अतिष बारणे, रवी घोडेकर, पिंपरी चिंचवड स्वीट असो. चे निरंजन अग्रवाल आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळावर कामगार नेते इरफानभाई सय्यद, प्रवीण जाधव व पुणे माथाडी मंडळावर परेश मोरे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आभार परेश मोरे व प्रवीण जाधव यांनी मानले.