- करोनावरील लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूटला देणार भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२०) :- करोनावरील लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी (२८ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कंपनीला भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे. मात्र त्यापूर्वीच शुक्रवारी कंपनीच्या आसपासच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून या भागामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिटय़ूट आणि जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स कंपनीत कोविशिल्ड लस तयार करण्यात येत आहे. त्या लसीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी हे दुपारी एक ते दोन या वेळेत येणार आहेत. त्यावेळी सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी मोदी संवाद साधणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दुपारी साडेबाराच्या सुमारास मोदी लोहगाव येथील विमानतळावर दाखल होतील. तेथून हेलिकॉप्टरने ते सीरम इन्स्टिटय़ूट येथील हेलीपॅडवर एक वाजण्याच्या सुमारास दाखल होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील तीन विशेष गाड्या देखील सीरम इन्स्टिटय़ूटच्या परिसरात दाखल झाल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत अधिकृत माहिती गुरुवारी देण्यात आली.
















