- बोगस मतदान झाल्याची शक्यताच अधिक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२०) :- पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज (दि.१ ) मतदान झाले. पुणे पदवीधरसाठी ५२.६९ टक्के तर शिक्षक मतदार संघात ७६.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. आज सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या मतदानाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
पुणे पदवीधरसाठी भाजपकडून संग्रामसिंग देशमुख तर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अरुण लाड व मनसेकडून रूपाली पाटील-ठोंबरे यांच्यात चुरशीची लढत आहे. जवळपास गेले पंधरा दिवसांपासून या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी एकमेकांवर झाडल्या जात होत्या. भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेने पदवीधर व शिक्षक निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
शेवटच्या दिवसात अर्ज केलेल्या शंभर टक्के लोकांची नावे मतदार यादीत घेण्यात आली आहेत. ही नावे यादीत समाविष्ट करताना कोणत्याही प्रकारची चाळणी लावली गेली नाही. यामुळे एकाच मतदाराचे नाव दहा, आठ वेळा यादीत आले आहे. दुबार मतदारांची संख्या तर खूपच मोठी आहे. यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता अधिक आहे. छायाचित्र नसलेले मतदार, नावातील चुका, चुकीचा ओळखपत्र क्रमांक हा मतदार यादीतील गोंधळ कमी असताना मतदान केंद्रांमुळे या गोंधळात अधिकच भर पडली होती.