- पहिल्या फेरीच्या मतमोजणीला दुपारचे तीन-चार वाजणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२०) :- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- २०२० अंतर्गत मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी ८ वाजता सुरवात झाली. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे.
पुणे विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघात ४ लाख २६ हजार २५७ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार ५० (७७.९६ टक्के) मतदारांनी मतदान केले. तर शिक्षक मतदारसंघात ७२ हजार ५४५ मतदारांपैकी ५२ हजार ९८७ म्हणजे ७३.०४ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. एकूण मतदानाची वाढलेली एकूण उमेदवारांची संख्या यामुळे पाचही जिल्ह्याची मतपत्रिका एकत्र करणे, त्यातून वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करणे, त्यानंतर पहिल्या पसंती क्रमांकात निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित करून प्रत्यक्ष पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यासाठी गुरूवारी (दि. ३) दुपारचे तीन चार वाजणार आहेत.
तर पहिल्या फेरीत एखाद्या उमेदवाराने मतांचा कोटा पूर्ण न केल्यास उलट्या क्रमाने पसंतीची मते मोजावी लागतील व मतदानाची प्रक्रिया खूपच लांबून अंतिम निकाल हाती येण्यासाठी शुक्रवारचे पाच वाजतील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.
पदवीधर मतदारसंघासाठी ६२ उमेदवार असल्याने ही मतपत्रिका जम्बो झाली. मतपत्रिका हाताळण्यासाठीही विलंब लागणार आहे. शिक्षक मतदारसंघासाठी ३५ उमेदवार आहेत. पदवीधरसाठी ४ लाख २६ हजार २५७ मतदारांपैकी २ लाख ४७ हजार पन्नास मतदारांनी मतदान केले आहे. ५७.९६ टक्के मतदान झाले आहे. शिक्षक मतदारसंघ ७२ हजार ५४५ मतदारांपैकी ५२ हजार ९ ८७ म्हणजेच ७३.०४ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. पहिल्या टप्प्यात वैध आणि अवैध मतपत्रिका वेगवेगळ्या केल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. बालेवाडी स्टेडियममध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण केली असू, पदवीधरसाठी ११२ आणि शिक्षक मतदारसाठी ४२ टेबल लावले आहेत.