- स्पर्धेच्या दिमाखदार आयोजनाचे अति. पोलीस आयुक्तांकडून कौतुक..
- लीग’ च्या माध्यमातून सोसायट्यांमध्ये बंधुत्वभावनेचे दर्शन – विनायक गायकवाड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- वाकड परिसरात विनायक गायकवाड युथ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या बहुचर्चित ‘वाकड प्रीमियर लीग’ चा चषक अनावरण समारंभ सोहळा सोमवारी (दि. २१) रोजी मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला.
स्पर्धेच्या चषक अनावरण सोहळ्याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त मंचक इप्पर, हाय परफॉर्मन्स एनालिस्ट सौरभ वालकर, सिने अभिनेते प्रकाश जावडे, माजी स्थायी समिती सभापती, नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, वाकड, कस्पटे वस्ती, ताथवडे परिसरातील सहभागी संघातील सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्तिथ होते.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मंचक इप्पर यांनी ”मी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सोसायटी सभासदांकरीता भरवलेले सामने बघत आहे. स्पर्धेचे नियोजन उत्तमरित्या करण्यात आले आहे. सर्व नोकरदार वर्गासाठी खेळाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामन्यांसाठी पोलीस विभागामार्फत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत, त्यांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले”.
टीव्ही, मोबाइल, सोशल मीडियाच्या कृत्रिम विश्वात जगत असलेल्या पालकांना व त्यांच्या मुलांना मैदानी खेळाची गोडी लागावी आणि रहिवाशांमधील मैत्री अधिक वृद्धिंगत व्हावी, या हेतूने ‘वाकड प्रीमियर लीग’ या क्रिकेट स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत १०० पेक्षा जास्त सोसायटीमधील संघ सहभागी होतात. त्यामुळे वाकड परिसरात या स्पर्धेची उत्सुकता असते. या स्पर्धेत सोसायटीतील आबालवृद्ध आवडीने सहभागी होतात. स्पर्धांमुळे सर्व रहिवाशांची एकमेकांशी घट्ट मैत्री झाली असून, बंधुत्वभावना वाढली आहे. या वर्षीच्या वाकड प्रीमियर स्पर्धेच्या विजयी संघाचा बहुमान आपल्याच सोसायटीला मिळावा यासाठी स्पर्धक वर्षभर तयारी करीत असतात. अटीतटीच्या सामन्यांमध्ये रंगत येऊन अतिशय खिलाडू वृत्तीचे दर्शन या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते. येत्या काही दिवसातच या रंगतदार क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरु होणार आहेत. त्याचा वाकड प्रभागातील क्रिकेट शौकिनांनी आस्वाद घ्यावा.
– मा. विनायक गायकवाड (माजी नगरसेवक, पिं. चिं. मनपा)…