- अभ्यास दौऱ्यात मात्र एकाही अधिकाऱ्याचा समावेश नाही..
- मग सहल की अभ्यास दौरा; जाणकारांच्या भुवया उंचावल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- झोपडपट्टीधारकांना वस्तू देण्याचा विषय महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विषयासाठी आग्रही असणारे महिला आणि बालकल्याण समितीचे सदस्य केरळ दौऱ्यावर गेले आहेत. या दौन्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.
महिला आणि बालकल्याण समितीने नागरवस्ती विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना दोन चादर, दोन कंबल, दोन दरी पंजा, दोन बेडशीट, दोन पिलो कव्हर अशा विविध वस्तू देण्यासाठी मुंबईतील महाराष्ट्र हातमाग सहकारी महासंघाकडून शासकीय दरानुसार थेटपणे खरेदी करण्याचा सदस्य महापालिका स्थायी समितीसमोर ठेवला होता. हा विषय स्थायी समितीने मंजूर केला.
दुसऱ्याच दिवशी सात सदस्य केरळ दौऱ्यावर गेले आहेत. समितीच्या दौऱ्यात विशेष म्हणजे एकही अधिकारी गेला नाही. प्रशासनास या दौऱ्याची कल्पना नाही. यात सभापती चंदा लोखंडे, भाजपच्या माधवी राजापुरे, सविता खुळे, योगिता नागरगोजे, निर्मला गायकवाड आणि राष्ट्रवादीच्या गीता मंचरकर, निकीता कदम असे सात सदस्य केरळच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. तर, राष्ट्रवादीच्या मंगला कदम, शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांनी दौऱ्यावर जाणे टाळले आहे. शनिवारपर्यंत दौरा असणार आहे. दौरादेखील गुपचूप काढला आहे. ही सहल एका ठेकेदाराने काढल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.


















