- पालिकेकडून शिथिल केलेले नियमही होतायत कडक..
- मास्कची सक्ती; थुंकीबहाद्दरांना दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने शहर परिसरातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. या संदर्भातील नियमावली अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी बुधवारी जाहीर केली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत कमी झालेला कोरोनाचा विळखा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाढू लागला आहे.
शंभराच्या आत आलेली रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा आलेख कमी झाल्याने शिथिल केलेले निर्बंध कडक करण्याच्या उपाययोजना महापालिका प्रशासनाच्या वतीने अवलंबल्या जाणार आहेत. यासंदर्भात आज नवीन आयुक्त राजेश पाटील यांनी कोरोना संदर्भात बैठक घेऊन आरोग्य आणि वैद्यकीय विभागास सूचना दिल्या आहेत. तसेच नवीन नियमावली जाहीर केली आहे. शहर परिसरातील सार्वजनिक ठीकाणी, शासकीय, खासगी कार्यालयात मास्क वापरणे बंधन कारक केले आहे.
सांस्कृतिक सभागृह, सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन सभा-संमेलन अशा गर्दी होणा-या ठिकाणी मास्क आणि सेनीटायझरचा वापर बंधनकारक केला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, उपहारगृहे, बाजारपेठ मॉलमध्ये मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना पाचशे तसेच थुंकणाऱ्या नागरिकास एक हजार दंड आकारण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत असून याचे प्रमुख कारण नागरिक मास्कचा वापर करत नाही, नियमांचे पालन करीत नाहीत, हे दिसून आले आहे. तसेच सरसकट नियमांचे उल्लघन होत आहे. त्यामुळे शिथिल केलेले नियम कडक करण्यात येत आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.