- अनंतनगरच्या अपघातग्रस्त मुलावर नगरसेवक शैलेश मोरेंची मदतीची फुंकर..
- बघ्यांनी फोटो काढत न बसता दुखापतग्रस्ताला आधार द्यावा – नगरसेवक शैलेश मोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- चिंचवडमधील एम्पायर इस्टेट सोसायटीनजीकच्या रांका ज्वेलर्ससमोर एका १३ वर्षीय मुलाचा शुक्रवारी (दि. १९) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास गंभीर अपघात झाला होता. त्याच्या पायाला मोठी जखम होऊन तो निपचित पडल्याचे स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पुढील हालचाली करून, त्या अल्पवयीन मुलाला लगोलग पुढील उपचारासाठी चिंचवडच्या बिर्ला रुग्णालयात दाखल केले.
तेथील डॉक्टरांनी उपचाराचा भला मोठा खर्च सांगितल्याने नगरसेवक शैलेश मोरे व सामाजिक कार्यकर्ते योगेश मालखरे यांनी रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा करून, मुलावर होणाऱ्या उपचाराचा खर्च माफ करून दिला व माणुसकीचे दर्शन घडविले. त्यामुळे त्यांच्यावर समाजातील सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबाबत माहिती देताना नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले की, ”चिंचवड स्टेशन येथील अनंतनगरचा १३ वर्षीय विवेक सावंत हा मुलगा रांका ज्वेलर्स समोरील मुंबई-पुणे महामार्गावर गंभीर अपघात होऊन रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडला होता. रस्त्यावर गर्दी झाल्याचे लक्षात आल्याने पहावयास गेलो असता, या मुलाचा अपघातात पायाला गंभीर दुखापत होऊन पाय निकामी झाल्याचे दिसले. मदतीसाठी कोणीही पुढे येताना दिसत नव्हते. सर्वजण फोटो काढण्यात मग्न होते. त्वरित मी व सामाजिक कार्यकर्ते योगेश मालखरे आम्ही रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. त्यानंतर त्या मुलाला पुढील उपचारासाठी चिंचवडच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शस्रक्रिया व पुढील उपचारासाठी चार ते पाच लाखांचा खर्च सांगितला. त्या मुलाचे पालक गरीब होते. उपचाराचा खर्च एकूण पालकांवर आभाळ कोसळले. उपचारासाठी एवढे पैसे कुठून आणायचे? असा सवाल करीत त्या मुलाच्या पालकांनी आमच्या पुढेच टाहो फोडला. मी त्यांना धीर देत रुग्णालय व्यस्थापनाशी पुढील चर्चा करून त्या मुलाचा संपूर्ण उपचाराचा खर्च माफ केला. आज त्या मुलावर बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु असून, एक ते दोन दिवसात त्याच्या पायाची शस्रक्रिया होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे”.
”पिंपरी चिंचवड शहरात महामार्ग असो की सेवा रस्ता दररोजच अपघात होत असतात. अशावेळी बघ्यांनी फोटो काढता न बसता त्या दुखापतग्रस्ताला मदतीचा आधार दिला पाहिजे. त्वरित रुग्णवाहिकेशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती द्यावी. सामाजिक कार्य म्हणून त्या अपघातग्रस्ताला रुग्णालयात भर्ती करावे. त्यामुळे माणुसकी जिवंत राहील. अन्यथा मदतीअभावी एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, या प्रकारापासून बघ्यांनी शिकवण घ्यावी.”
– शैलेश मोरे, नगरसेवक, पिं. चिं. मनपा….