- सनदशीर मार्गाने अर्जविनंत्या करूनही बांधकाम व्यावसायिकाच्या पत्राशेडवर कारवाई..
- हिटलरशाही वृत्तीचा बांधकाम व्यवसायिकाकडून निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई निष्पक्षपणे होत नसून पक्षपात केला जात असल्याचे आरोप वारंवार होत आहेत. रावेतमधील कारवाईवर देखील पक्षपाताचे आरोप होत आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून रावेतमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे बांधकाम व्यावसायिक मे. गायकवाड वंजारी असोसिएटसच्या वतीने बी.व्ही. गायकवाड यांनी सोमवारीच महापालिकेला आपण स्वतःहून आठ दिवसांच्या आत अनधिकृत बांधकाम स्वखर्चाने हटवित असल्याचे पत्र दिले होते. येथे आपले सामान असून ते हटविण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली होती आणि सामान काढण्यास सुरुवातही केली होती. परंतु, दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या संबंधित विभागाने कारवाई केली.
मे. गायकवाड वंजारी असोसिएटसच्या व बी.व्ही. गायकवाड या बांधकाम व्यावसायिकांच्या फर्मची रावेतमध्ये स.न. १३९/३ मध्ये दहा गुंठे जागा आहे. याठिकाणी गायीसाठी गोठा, गुराखी व कार वॉशिंग सेंटरसाठी पत्राशेड उभारण्यात आले होते. मात्र पत्राशेडचे काम तत्काळ काढून घेण्याबाबत महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने नोटीस बजावली होती. दरम्यान, महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून मंगळवारी (दि.२३) जेसीबीच्या सहाय्याने पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले. तर स्वत:हून काढलेले शटर व पत्र्यावरदेखील जेसीबी घालून सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाने आमच्यावर पक्षपातीपणाने व कोणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई करीत आमच्या मालमत्तेचे नुकसान केले. आम्ही सामंजस्यपणाने भूमिका घेत, पालिकेकडे कारवाईला आठ दिवसांची स्थगिती देण्याची पत्राद्वारे विनंती केली. तरीही, पालिकेच्या प्रशासन विभागाने कोणाच्यातरी दबावाखाली येऊन आमच्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान केले. तसे पहिले तर, अर्ध्याच्यावर पिंपरी चिंचवड शहरात अनिधकृत बांधकामे आहेत, त्यांच्यावरील कारवाई टाळून, आम्ही सनदशीर मार्गाने अतिक्रमण हटवीत पालिकेला सहकार्य करीत असतानाही पालिकेने आमचेच दात आमच्याच घशात घालण्याचा उफरटा कारभार करीत आमचे नुकसान केले. या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
– मे. गायकवाड वंजारी असोसिएटस, बी.व्ही. गायकवाड….