- पिं. चिं. लघुउद्योजक संघटनेची पालिका आयुक्तांच्या कचेरीत धाव…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने औद्योगिक परिसरातील उद्योजकांना तीन – चार वर्षांपूर्वी रद्द झालेल्या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे उद्योजक धास्तावले आहेत. उद्योजकांना एलबीटीच्या खोट्या नोटिसा पाठविल्या जात असून, त्या रद्द कराव्यात, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेने महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व संचालक नवनाथ वायळ यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत उद्योजकांच्या अडचणी मांडल्या. एलबीटी लावल्यानंतर उद्योजकांनी महापालिकेने मागितलेली सर्व कागदपत्रे देऊनही विविध कागदपत्रे आणखी हवीत, असे सांगत नोटिसा बजावल्या आहेत.
एलबीटी बंद झाली त्यावेळेसच उद्योजकांकडून सर्व थकबाकी वसूल केली असतानाही थकबाकीच्या खोट्या नोटिसा देण्यात येत आहेत. थकबाकी होती तर तशी कल्पना उद्योजकांना द्यायला हवी होती. आता अचानक एलबीटी आणि त्यावर शंभर टक्के शास्ती लावून बिले दिली जात आहेत.