- बिले भरून पालिकेस सहकार्य करा, पालिकेचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- महापालिकेची सर्व १६ कर संकलन कार्यालये ही साप्ताहिक सुटीच्या दिवशी म्हणजेच रविवारी देखील खुली राहणार आहेत. त्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रोखीने बिले स्वीकारले जाणार आहे. बिले भरून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त स्मिता झगडे यांनी शुक्रवारी (दि. २६) केले आहे.
शास्तीकराची थकबाकी वगळून मूळ मिळकतकर स्वीकारला जात आहे. ती सवलत मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. सन २०२०-२१ आर्थिक वर्ष संपण्यास केवळ एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे नागरिक कर भरण्यास गर्दी करतात. नागरिकांना सोयीचे व्हावे, म्हणून साप्ताहिक सुटीच्या दिवशी रविवारीही सर्व कर संकलन कार्यालये सुरू राहणार आहेत.
रविवार (दि. २८) तसेच, मार्च महिन्यातील सर्व रविवारी कार्यालयात रोखीने बिले स्वीकारली जातील. इतर दिवशी कामामुळे ज्यांना कर भरणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. थकीत बिलावर ७५ टक्के दंड माफी सवलत २८ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.


















