- मनशक्तीचे कारक पुस्तकाने कौटुंबिक जीवनशैली सुलभ होईल – प पू अनंत काका पोतदार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२१) :- लेखक विजय पाटील यांनी त्यांचे वडील कै. वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रहाटणी पिंपळे सौदागरमधील “अनंत मठ” येथे ‘मनशक्तीचे कारक – यंत्र मंत्र तंत्र’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
या प्रसंगी प.पू.अनंत काका पोतदार, कमलेश मोकाशी गुरुजी, श्रद्धेय गं.भा.गुरुमाई रेखा रामदास कांबळे, संत साहित्याच्या अभ्यासक मंगलाताई घाळी, उप प्राचार्य प्रमोद पाटील सर, गोरख दे. पाटील, दिपक पाटील, विजय मुनोत, संतोष चव्हाण, सोनल पंकज मुळे (जहागीरदार), उद्योजिका कविता बेंडाळे, अध्यापक रुपाली पाटील, निलेश पोतदार, अर्चना दाभोळकर घाळी, बाबासाहेब घाळी, डॉ. अमृत गाडे, योगेश कड, अंकुश माने यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी प्रकाशक व लेखक विजय पाटील यांनी खोपोली येथे महायोगी गगनगिरी महाराज आश्रम येथे प.पू आशिष महाराज, व महंत मंडलगिरी महाराज यांची भेट घेतली व आशीर्वाद घेतला.
पुस्तक प्रकाशन प्रसंगी प पू अनंत काका पोतदार म्हणाले,” मनशक्तीचे कारक या पुस्तकामुळे कौटुंबिक जीवनशैली नक्कीच सुलभ होईल. त्याचप्रमाणे भारतीय पुरातण वैदिक पद्धतीचे व उपायांची जनसामान्यांना माहिती प्राप्त होईल. वेद ,पुराण,शास्त्र आणि उपनिषद ही ग्रंथसंपदा जनकल्याण हेतूनेच निर्मित झालेली आहेत. हजारो वर्षांपासून मनुष्य त्यातील यंत्र, तंत्र मंत्राचा उपयोग संकटांवर मात करण्यासाठी करीत आलेला आहे. ह्या आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचा नक्कीच सर्वांना लाभ होईल यात शंका नाही.
उपप्राचार्य प्रमोद पाटील सर म्हणाले,” वसंतराव पाटील हे माझे जरी सासरे असले तरी त्यांची अध्यात्मिक विषयांची खोली व ग्रंथ चिकित्सा ज्ञान खूप उच्च प्रतीचे होते. त्यामुळे ते मला गुरु प्रमाणेच होते. वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थ्यांना जीवनात मोठी शैक्षणिक प्रगती साधता आली.
श्रद्धेय गं.भा. रेखा कांबळे (कानिफनाथ मठी- चिंचवड) म्हणाल्या,” नाथ- दत्त संप्रदायामध्ये मन सामर्थ्य प्रबळ करण्यासाठी मंत्र शक्तीचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे मानवी जीवन नक्कीच दुःख मुक्त होते.प्रस्तुत पुस्तकामुळे पारंपरिक सुलभ तोडगे आणि उपाय सर्वांना माहिती पडतील.व त्यांचा वापर संकटमुक्तीसाठी नक्कीच होईल.
कमलेश मोकाशी गुरुजी म्हणाले, “सध्या आपला देश “कोरोना” ह्या साथीच्या रोगाच्या विळख्यात अडकलेला आहे. त्यामुळे देशात मोठे आर्थिक संकट ही उभे राहिलेले आहे, सर्वांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, लाखो नागरिकांना ह्याचे संक्रमण झाले आहे. अश्या बिकट आणि कठीण काळात मानसिक आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी ग्रंथ वाचन, पुस्तक वाचन महत्वाचे ठरेल. आजचे हे प्रकाशित झालेले पुस्तक नागरिकांना नक्कीच उपयोगी ठरेल.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये प्रास्ताविक लेखक विजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कमलेश मोकाशी यांनी केले. कार्यक्रमास विशेष परिश्रम विवेक वासगडेकर, खेमबहादूर गुरुंग यांनी केले.


















