- भाजपच्या नितीन लांडगेंकडून प्रतिस्पर्धी भालेकरांचा अवघ्या पाच मतांनी पराभव..
- राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वाघेरेंच्या खात्यावर आणखी एका पराभवाची नोंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. मार्च. २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांना १५ पैकी सर्वाधिक १० मते मिळाल्याने त्यांची स्थायी समिती सभापतीपदी वैधरित्या निवड झाल्याचे पिठासीन प्राधिकारी तथा नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी जाहिर केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकीसाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी या विशेष सभेचे पिठासीन प्राधिकारी म्हणून काम पहिले.
महापलिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक झाली. स्थायी समिती सभापती पदासाठी अॅड.नितिन लांडगे आणि प्रविण भालेकर यांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. पिठासीन प्राधिकारी यांनी अर्जांची छाननी करून दोनही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या अवधीमध्ये कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे हात वर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये अॅड.नितिन लांडगे यांना उपस्थित एकूण १५ सदस्यांपैकी १० सदस्यांची मते मिळाली तर प्रविण भालेकर यांना ५ सदस्यांची मते प्राप्त झाली.
नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांचे पिठासीन प्राधिकारी श्रावण हर्डीकर, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, आयुक्त राजेश पाटील, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समितीचे मावळते सभापती संतोष लोंढे आदींसह पदाधिकारी आणि नगरसदस्यांनी अभिनंदन केले. नगरसचिव तथा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी निवडणूक कामकाज पाहिले.
यावेळी अॅड. नितीन लांडगे आणि प्रवीण भालेकर यांच्यासह स्थायी समिती सदस्य शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भिमाबाई फुगे, पोर्णिमा सोनावणे, सुलक्षणा धर, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, राजू बनसोडे, मीनल यादव, नीता पाडाळे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, कायदा सल्लागार तथा उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.
















