- खासगी वाहनांकडून तासानुसार शुल्क वसुलीस लवकरच सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात पार्किंग पॉलिसीअंतर्गत सशुल्क वाहनतळ (पे अॅण्ड पार्क) योजना सुरू करण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. शहरातील रस्त्यावर पांढरे पट्टे मारून पार्किग व नो पार्किंगचे फलक लावले जात आहेत. येत्या १ ते २ आठवड्यांत शहरातील ६ भागांत खासगी वाहनांकडून तासानुसार शुल्क वसुलीस सुरुवात केली जाणार आहे.
पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी आणि स्मार्ट सिटीची गरज ओळखून पालिकेने पार्किंग पॉलिसी बनविली आहे. त्याला सर्वसाधारण सभेने २०१८ ला मंजुरी दिली. या योजनेचा सुधारित प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने २२ जून २०१८ ला मंजुरी दिली. प्रत्यक्ष अंमलबाजवणीस आता सुरूवात करण्यात आली आहे. निश्चित केलेल्या भागातील रस्त्यांवर पांढरे पट्टे मारले जात आहेत. दुचाकी, मोटारसाठी पार्किग, नो पार्किंग असे फलक लावले जात आहेत. तसेच, अनेक ठिकाणी झेब्रा कॉसिंगचे पट्टे मारण्यात आले आहेत.
निगडी वाल्हेकरवाडी स्पाइन रस्ता, पुणे – मुंबई जुना महामार्ग, टिळक चौक ते प्राधिकरणातील बिग इंडिया चौक, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी रेल्वे स्थानकाजवळील दोन्ही बाजू या भागात सशुल्क पार्किंग असणार आहे. वाल्हेकरवाडी रस्ता, हिंजवडी ते चिंचवड स्टेशन, काळेवाडी फाटा ते एम्पायर इस्टेट तसेच, केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट ते देहू – आळंदी रस्ता, स्पाइन रस्ता या भागात खासगी वाहनांस शुल्क द्यावे लागेल. थेरगाव गावठाण रस्ता, थेरगाव फाटा ते प्रसुंधाम लिंक रस्ता, औंध – रावेत रस्ता आणि टेल्को रस्ता, नाशिक फाटा ते मोशी रस्ता तसेच, निगडीतील भक्ती – शक्ती समूह शिल्प चौक, उड्डाणपुलाखाली, नाट्यगृह व मोकळ्या जागा या ठिकाणी तासानुसार शुल्क घेतले जाणार आहे.
















