- कर आकारणी व करसंकलन विभागाची मोठी घौडदौड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मार्च. २०२१) :- कोरोनात महापालिकेचे उत्पन्न कमी झाले असताना महापालिका करआकारणी आणि करसंकलन विभागाने फेब्रुवारी महिन्यातील चार आठवड्यात विक्रमी वसूली केली आहे. १२२ कोटी रुपयांचा महसूल कर जमा केला आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात सध्या ५ लाख ३० हजार २७८ मालमत्ता आहेत. मालमत्तांच्या करापोटी महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडते. जकात कर आणि स्थानिक संस्था कर रद्द झाल्यांनतर शहरात महापालिका उत्पन्नाचा मोठा स्रोत बंद झाला आहे. त्यामुळे मालमत्ताकर उत्पन्नावर महापालिकेची मोठी भिस्त आहे.
शहरातील उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामळे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. शहरातील बिगरनिवासी आणि निवासी मालमत्तांमध्ये वाढ होत आहे. २०१० मध्ये शहरातील मालमत्तांची आकडेवारी २ लाख ८८ हजार होती. २०१५ मध्ये मालमत्तांची संख्या ४ लाख ७ हजारांवर पोहचली. तर २०२० अखेर शहरात ५ लाख ३० हजार २७८ मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसूल करण्याचे मोठे आव्हान मालमत्ताकर विभागाने पार पाडले आहे. करआकारणी आणि करसंकलन विभागाने यंदा थकीत कर वसुलीच्या उद्दिष्टाकडे प्रामुख्याने लक्ष दिले, त्यामुळे उत्पन्न वाढले आहे.
















