- निगडी पोलीस ठाण्याची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२१) :- नकली पिस्तुलाच्या धाकाने लूटमार करणाऱ्या दोन जणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लुटमारीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. निगडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढून कारवाई केली.
लक्ष्मण नागनाथ इगवे (वय २१) आणि अजय प्रकाश जाधव (वय २३, दोघेही रा. देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. १३ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास फिर्यादी तमीम अल्लाबक्ष अन्सारी (वय ४० रा. चिखली) हे संभाजी चौक, आकुर्डी येथे पत्नीची वाट पाहत मोटारीत बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चाकू आणि पिस्तुलाचा धाक दाखवून अन्सारी यांच्याकडून लॅपटॉप, मोबाइल आणि रोख पाच हजार रुपये असा एकूण १४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक आर. बी. बांबळे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार ५ मार्च रोजी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी म्हाळुगे पोलीस चौकीच्या हद्दीत दोन तर निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एक गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपींकडून तीनही गुन्ह्यातील एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
















