- मोबाईलमध्ये आढळली ओळखपत्राची बनावट प्रत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२१) :- मास्क कारवाई करीत असताना आयबीचा (इंटेलिजन्स ब्युरो) तोतया अधिकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बुधवारी (दि.१०) रात्री साडेआठच्या सुमारास आकुर्डी चौकात ही कारवाई करण्यात आली. प्रतिक सुनिल भावसार (२५ रा. विशालनगर, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आकुर्डी रेल्वे स्थानक नजीकच्या चौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु होती. दरम्यान, आरोपी मास्क न घालता जात असताना पोलिसांनी त्याला अडवून ५०० रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यावेळी त्याने आपण आयबीचा अधिकारी असल्याचे आकुर्डी पोलिसांना सांगितले.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आरोपीकडे ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली. त्यावर, आम्हाला ओळखपत्र दाखवण्याची परवानगी नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलमध्ये ओळखपत्राची बनावट प्रत आढळून आल्याने त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
















