- भोसरीतील घटना; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२१) :- एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एकाने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. ही घटना भोसरी येथे घडली. पोपट कृष्णा गायकवाड (६६, रा. गजानन हौसिंग सोसायटी, खंडोबा माळ, भोसरी) यांनी बुधवारी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ मार्च रोजी दुपारी साडेबारा ते पावणे एक वाजताच्या सुमारास फिर्यादी गायकवाड हे बँक ऑफ बडोदा जवळ असणाऱ्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे चार जण आले. त्यापैकी एका अनोळखी चोरट्याने पैसे काढून देतो, असे म्हणून फिर्यादीचे एटीएम कार्ड घेतले.
त्या एटीएम कार्डची आदला बदल करून दुसरे एटीएम कार्ड फिर्यादी गायकवाड यांना दिले. चोरलेल्या एटीएम कार्डद्वारे फिर्यादी यांच्या बँक खात्यावरील ३९ हजार ५०० रुपये वेगवेगळ्या ठिकाणावरून काढून गायकवाड यांची फसवणूक केली. पोलिस हवालदार तिटकारे तपास करीत आहेत.


















