- साखरपुडा, लग्न, दशक्रिया आदींसाठी केवळ ५० जणांनाच परवानगी..
ज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२१) :- कोविड-१९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व कार्यवाही याबाबत पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठक अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली व गिरीष बापट, खासदार, श्रीरंग बारणे,
विभागीय आयुक्त-पुणे व जिल्हाधिकारी-पुणे तसेच महापौर व आयुक्त-पिंपरी चिंचवड व पुणे इ.चे प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये महापौर यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली.
त्यांत शहरामध्ये भाजी मंडई, बाजारपेठा, दुकाने अशा गर्दीच्या ठिकाणी व प्रवास करताना मास्क परिधान करणे बंधनकारक करावे याबाबत चर्चा करुन पोलीस यंत्रणेने देखील यावर नियंत्रण ठेवावे असा मुद्दा उपस्थित केला. तसेच नागरिकांनी दफनभूमी, दहनभूमी, दशक्रिया विधी इ. ठिकाणी गर्दी न करता जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीच्या मर्यादेचे पालन करुन योग्य सामाजिक अंतर ठेवून विधी पार पाडावेत, असे बैठकीत ठरले. शाळा, विद्यालये व महाविद्यालये दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवणेबाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे साखरपुडा, लग्न तसेच इतर कौटुंबिक समारंभाकरिता कमाल ५० व्यक्तींची मर्यादा घालणेत यावी. सार्वजनिक हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅफे, धार्मिक स्थळे, यात्रा, सामाजिक कार्यक्रम, विविध प्रकारचे स्टॉल्स इ.वर निर्बंध घालून ते वेळेत बंद करणे तसेच सार्वजनिक उद्याने, बागबगीचे, मॉल्स, मार्केट, चित्रपटगृहे बंद ठेवण्यात यावे याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत संचारबंदीची वेळ रात्रौ १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली.
बैठकीत कोरोना संकटावर मात करण्यासाठी मनपाची आजची परिस्थिती व भविष्यात करावयाच्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी लस देणेकामी लसीकरण केंद्रे वाढविण्यात यावी तसेच वाकड येथील कोविड-१९ हॉटस्पॉट परिसरात लसीकरण केंद्रे वाढवून सर्व ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर लस मिळण्याची सोय करण्याची विनंती केली. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. सर्वांनी सांघिकरित्या एकमेकांस सहकार्य करुन काम केल्यास कोरोनावर मात करणे शक्य होईल, इतर कोरोनाचा प्रार्दुभाव वाढलेल्या शहरांप्रमाणे आपल्या शहरावर अशी वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहून शासनास व महानगरपालिकेस कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सहकार्य करावे असे नम्र आवाहन यावेळी महापौर यांनी केले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात साबणाने स्वच्छ धुणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सुरक्षित अंतर ठेवावे आणि शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
















