- १९ मार्च रोजी अर्ज भरणा; तर, २३ मार्चला निवडणूक…
- उपमहापौर पदासाठी भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचे आघाडीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. मार्च २०२१) :- पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १९ मार्च रोजी तीन ते पाच या वेळेत निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहेत. २३ मार्च रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
केशव घोळवे यांनी ५ मार्च रोजी महापौर उषा ढोरे यांच्याकडे उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे. दरम्यान वसंत बोराटे यांचे उपमहापौरपदासाठी नाव निश्चित असल्याचे भाजपमधील सूत्रांनी समजते.
















