- आयुक्त कार्यालयात पाण्यासाठी महिलांचे ठिय्या आंदोलन..
- नगरसेविका विनया तापकीरांची प्रशासनला तंबी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. मार्च २०२१) :- चऱ्होलीतील गंधर्वनगर फेज दोनमध्ये मागील एक महिन्यापासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. गेले सहा दिवस तर कसलाच पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी दयनीय अवस्था झाली आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
पाणीपुरवठा विभागाचे टकले, वहिकर, फाटक तसेच जगताप या अधिकाऱ्यांना तेथील परिस्थिती समक्ष नेऊन दाखवली आहे. परंतु तरी देखील महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग याचे नियोजन करताना दिसून येत नाही. अजून उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात होयची आहे. पाणीपुरवठा विभागाचा कारभार म्हणजे पहिल्याच घासाला खडा असा असल्याचे दिसून येत आहे.
अजून उन्हाळा सुरू होत आहे, तोपर्यंत समाविष्ट गावांमध्ये पाण्याची समस्या जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या नियोजनाविषयी व कामकाजाविषयी शंका येत आहे. एक तर मागील वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातही तो पुरेसा होत नसल्याने येथील रहिवासी पाण्याच्या समस्येने हैराण झाले आहेत.
पाणी हा सर्व महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाणीपुरवठा विभागाच्या योग्य नियोजना अभावी महिला भगिनींना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या टँकरची व्यवस्था केली आहे. परंतु टँकर हा काही पर्याय नाही. त्यामुळे तातडीने पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर, आयुक्त कार्यालयात सगळ्या महिलांना घेऊन ठाण मांडून बसेल, अशी सगळ्यांना तंबी दिल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी खडबडून कामाला लागले आहेत.
– विनया तापकीर, नगरसेविका…
















