- स्वतःकडील गटनेतेपदाचा द्यावा लागला राजीनामा..
- कोणतीही गटबाजी किंवा नाराजी नसल्याचा दिला निर्वाळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी गटनेतेपदाचा मंगळवारी राजीनामा दिला आहे. पक्ष आदेश आल्याने राजीनामा दिला आहे, असे कलाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे कलाटे यांनी राजीनामा दिला आहे. महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. राहुल कलाटे प्रभाग क्रमांक २५ वाकड, माळवाडी, पुनावळे, पंढारेवस्ती, भुजबळ, भूमकरवस्ती या प्रभागातून निवडून आले आहेत.
कलाटे यांनी शहरप्रमुखपदी काम केले आहे. महापालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर शिवसेना गटनेतेपदी वर्णी लागली. त्यांनी दोन वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद देखील भूषविले. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात कलाटे यांनी निवडणूकही लढविली होती. १ लाख १२ हजार मते मिळाली होती.
मीनल यादव या पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत. शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्या असताना अनेक वर्ष महापालिकेतील महत्त्वाची पदे त्यांना मिळाली नव्हती. पक्षाच्या कार्यालयात आलेल्या अर्जामध्ये अश्विनी चिंचवडे यांचा अर्ज आला नव्हता, ऐनवेळी त्यांचा अर्ज आला. त्यामुळे गटनेता म्हणून मी यादव यांचे नाव स्थायी समिती सदस्यपदासाठी सुचविले. पक्षाने त्याबाबत खुलास मागितला. रितसर खुलास दिला, त्यानंतर गटनेतेपदाचा राजीनामा देण्यास सांगितले गेले. पक्षाच्या आदेशानुसार मी राजीनामा दिला. कोणतीही गटबाजी किंवा नाराजी नाही.
– राहुल कलाटे, माजी गटनेते शिवसेना, पिंपरी चिंचवड महापालिका.
















