- कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या; सात जणांच्या विरोधात गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- भ्रष्टाचार लपविण्यासाठी कामगाराला वारंवार त्रास दिला. या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनूप आप्पासाहेब उदगावे (वय ३८, रा. मिरजगाव, ता. मिरज, जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.
प्रमोद मेमन, गुंडेपल्ली राधाकृष्ण, गणेश डोंगरे, अरविंद चौगुले, श्रीधर रामलिंगम, आदर्श सहाय, भोगशेट्टी हरीहरा अशी आरोपींची नावे आहेत. किशोर आप्पासाहेब उदगावे (वय ४१, रा. सांगली) यांनी सोमवारी (दि. २२) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१६ ते २० मार्च २०२१ या कालावधीत पिंपरी आणि शिवतेजनगर, चिंचवड येथील कार्यालयात घडला.
आरोपी हे कंपनीत भ्रष्टाचार करत असल्याची माहिती अनूप यांच्याकडे होती. भ्रष्टाचार लपविण्यासाठी आरोपींनी अनूप यांना त्रास देण्यास सुरुवात केली. ते अनूप यांना जाणीवपूर्वक ऑफिसच्या दूरदूरच्या साइटवर पाठवत होते. अनूप गावी गेले असता कामावर परत येण्यासाठी त्यांनी आरोपींना फोन केला असता ते फोन उचलत नव्हते. सर्वजण मिळून अनूप याच्या कामात अडथळा आणत होते. या त्रासाला कंटाळून अनूप याने २० मार्च २०२१ रोजी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.