- परिसरातील जेष्ठांची शौचालयांअभावी कुचंबणा..
- शिवसेनेच्या प्रा. भालेरावांची पालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालयांची उभारणी होताना दिसते. मात्र, कराडो रुपये खर्च केल्यानंतरही शहर अस्वच्छच आहे. शौचालये आहेत ती भलतीकडेच. दरमहा शौचालयाच्या स्वच्छतेसाठी ठेकेदारांवर लाखो रुपये उधळले जात आहेत. एवढे सगळे करूनही शहराच्या भरवस्तीत स्मार्ट सार्वजनिक शौचालयांची कमतरता भासत आहे.
म्हाडा कॉलनी, मोरवाडी परिसरात जेष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, सार्वजनिक शौचालयाअभावी नागरिकांची कुचंबणा होतेय. शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक तथा भारत सरकार दूरसंचार सल्लागार समिती सदस्य प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी पालिकेच्या ‘अ’ प्रभाग अधिकारी सुचेता पानसरे यांची भेट घेऊन ही वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच त्यांना निवेदनाद्वारे म्हाडा कॉलनी, मोरवाडी परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत अद्ययावत शौचालये उभारण्याची मागणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. आर. माडगूळकर उपस्थित होते.
म्हाडा कॉलनी, मोरवाडी परिसरात जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विविध कारणांमुळे, तसेच वॉकिंगसाठी नागरिक घराबाहेर पडतात. यात काहींना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास असणारे नागरिकही असतात. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला कोरोनाचा धोका अधिक आहे. मात्र, परिसरात शौचालयं नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिका स्वच्छतेच्या कामावर वर्षभरात दोनशे ते अडीचशे कोटी रुपये खर्च करते, यानंतरही काही ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची अवस्था अतिशय दयनीय आहे. तर इतर ठिकाणी ही सुविधाच नाही. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन म्हाडा कॉलनी, मोरवाडी परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत अद्ययावत शौचालये उभारण्यात यावीत, असे या निवेदनात प्रा. भालेराव यांनी म्हटले आहे.
















