- वारस नोंद प्रस्तावाला प्राधिकरणाकडून हिरवा कंदील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वाटप झालेल्या भूखंडांसाठी वारस नोंद करण्याच्य प्रस्तावाला प्राधिकरण सभेची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भूखंडधारकांच्या वारसांना वारस नोंदीमध्ये येणा-या अडचणी दूर होण्यास मदत मिळणार आहे.
प्राधिकरणाकडून ‘ लीझ डीड ‘ तत्त्वावर देण्यात आलेल्या भूखंडांच्या बाबतीत भूखंडधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसा हक्कावरून बरेच वाद उद्भवतात. त्यावर मार्ग काढण्याचा विषय बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. त्यानुसार, प्राधिकरणाकडून ‘ लीझ डीड ‘ तत्त्वावर भूखंड घेणाऱ्या भूखंडधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाची नोंद घेण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
मृत भूखंड धारकाच्या वारसांनी नोंदणीकृत अथवा बिगर नोंदणीकृत घोषणापत्र / संमतीपत्र अथवा त्याला अनुसरून इतर दस्त करणे आवश्यक आहे. या दस्तानुसार मृत भूखंडधारकाच्या मिळकतीवर एक किंवा एकापेक्षा अधिक वारस नियुक्ती करण्यास संमती दिलेली असल्यास अशा वारसाना प्राधिकरण कार्यालयाकडे वारस नोंद घेण्यासाठी अर्ज करावा लागेल. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यासोबत जोडलेले घोषणापत्र / संमतीपत्र याबाबत कोणत्याही न्यायालयात वाद आहे का अथवा कोणतीही तक्रार आहे, याबाबतची तपासणी प्राधिकरण प्रशासनाकडून केली जाणार आहे. याबाबत प्रकरण निहाय तपासणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्राधिकरणाच्या पॅनेलवरील तज्ज्ञ वकीलांचा ( विधीज्ञ ) अभिप्राय घेण्यात येईल. त्यांच्या अभिप्रायानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. प्राधिकरण सभेमध्ये त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.


















