- आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२१) :- महापालिका हद्दीमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विद्युतदाहिनींवर कमालीचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी नेमण्यात आलेल्या चार रॅपिड टीममधील कामगारांची संख्या १६ ने वाढविली आहे. त्याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी सरणाचाही अवलंब केला जाणार आहे.
निगडी, सांगवी, भोसरी, नेहरूनगर आणि लिंक रोड येथील शवदाहिनी- विद्युतदाहिनीमध्ये मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांत मृतांची संख्या वाढली आहे. याची दखल घेत पारंपरिक पद्धतीनेही अत्यविधी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे.
मृतदेहांचे अंत्यसंस्कार वेळेत होण्यासाठी आणि विलंब टाळण्याकरिता प्रत्येक स्मशानभूमीत समन्वयक नेमले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी समन्वयकांवर आहे. अंत्यसंस्कारास विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.
















